लता (लेखक- जयंत विद्वांस)

Lata Online Archive

A nice Marathi article by Jayant Vidwans, written on the occasion of the melody queen's 88th birthday. A Whatsapp forward with unknown original source, worth archiving for Lata-lovers.

लता (लेखक- जयंत विद्वांस)

बारा कमी शंभर...

देव कुणाच्या मुखातून काय भविष्य बोलून जाईल सांगता येत नाही. गुलाम हैदर त्या वाळक्या अंगाच्या एकोणीस वर्षाच्या मुलीला घेऊन निर्माता शशधर मुखर्जीकडे गेला होता. गरिबीने माणूस मूक होतो पण तिला त्यासाठी तोंड उघडणं हाच तर मार्ग होता. मुखर्जी म्हणाले तिचा आवाज खूप पातळ आहे. गुलाम हैदर बोलून गेला, 'पुढल्या काळात निर्माते तिच्या पाया पडून आमच्या सिनेमासाठी गा म्हणतील'. हैदरवाणी खरी ठरली. सार्वभौम सत्ता. अश्वमेधाचा वारू असा फिरला की जाईल तिथे तेच नाव. जग पादाक्रांत करून झालं, काही म्हणजे काही शिल्लक उरलं नाही. भूप रागात 'म' आणि 'नी' वर्ज्य असतात, मग उरतात फक्त पाच स्वर. सा, रे, ग, प आणि ध. दीनानाथांच्या घरात हा भूप राग दर दोन वर्षांच्या अंतराने आकाराला आला. ही 'सा' अग्रस्थानी, मग रे, ग, प भगिनी आणि भाऊ 'ध'. भूप म्हणजे राजा. त्याला 'मनी' वर्ज्य कारण तो सार्वभौम आहे, त्याला काय करायचीये तुमची चलनी संपत्ती घेऊन. आपण शरीरावर दागदागिने घालून मिरवतो, हे गळ्यामधे जडजवाहीर घेऊन आलेले स्वर्गीय आत्मे. सेहवाग, द्रविड, तेंडुलकर, गांगुली, लक्ष्मण एकाच टीममधून खेळण्याचा योग आपण अनुभवला हे आपलं भाग्यं तसंच हे कुटुंब. 

कृष्णाने गीता संस्कृतात सांगितली, बराचकाळ ती मर्यादित राहिली त्यामुळे, सामान्य लोकांना कसं कळणार, काही पिढ्या मुकल्या ज्ञानाला. ज्ञानेश्वरांनी ती मराठीत आणली, नुसती भाषांतरीत नाही केली तर अनंत चपलख उदाहरणं देऊन ती समजावून सांगितली. अनुवाद नव्हे तो, भाष्यं आहे ते. त्यामुळे काय झालं? तर ती सामान्यं माणसाला कळली. शास्त्रीय संगीत असंच बंदिस्त होतं. सामान्यांना त्यातलं फार कळत नाही म्हणून ते लांब रहातात त्यापासून. चित्रपट संगीताने ते काम केलं. अनेक गाणी रागदारीत झाली, लोकांना साधे, अर्थवाही शब्दं आपले वाटले, अर्थ पटले आणि संगीत खालपर्यंत पोचलं अगदी. तो सुवर्णकाळ होता कारण अनेक योग जुळून आले होते. शास्त्रीय संगीताचा अभ्यास असलेले संगीतकार, साधं, मनातलं लिहिणारे गीतकार आणि हीचा आवाज. आपणही गुणगुणू शकू अशी गाणी तिने म्हटली. गुणगुणताना कुठे माहित असतं आपल्याला, राग कुठला, ठेका कुठला आहे ते पण आपण गुणगुणतोच की. ज्ञान आणि कला बंदिस्त असेल तर तिचा उपयोग शून्यं आहे. काय केलं नाही तिच्या स्वरांनी? अनेक गोष्टी केल्या ज्याची आपण कधी दखलच घेतली नाही.

आयुष्यातल्या प्रत्येक भावनेला तिच्या गाण्याची सोबत आहे. लोरी असो, भक्तीगीत असो, विराणी असो, प्रेमगीत, भावगीत असो ती आहेच. पाण्याची संतत धार कशी असते तसा तिचा आवाज आहे. न तुटणारा. तिचा गद्य आवाजसुद्धा नाजूक आणि गोड आहे. ती एकमेवाद्वितीय आहे. अजर, अमर स्वर आहे तिचा. एलईडी बल्बनी प्रकाश खूप पडतो पण त्याच्याकडे बघितलं की डोळे दिपतात. तिचा आवाज समईच्या ज्योतीसारखा आहे. शांत, प्रकाश देणारा, नैराश्याचा अंधार दूर करणारा, वातावरण प्रसन्न करणारा. दैवी देणगी म्हटलं की होत नसतं सगळं, मेहनतीची जोड पण लागते त्यासाठी. त्यावर कुणी बोलत नाही. तिच्या या असल्या गुणांमुळे एक प्रॉब्लेम झालाय. हिणकस, बेसूर काही कानावर पडलं की ऐकलं जात नाही. तुलनाही करावीशी वाटत नाही कारण तुल्यबळात तुलना असते. तिने असा काही इतिहास लिहून ठेवलाय की तो पूर्ण ऐकेपर्यंत मरण आलेलं असेल. कित्त्येक जुनी गाणी अशी आहेत की कधी ऐकलीच नाहीत, चुकून कानावर पडली की नवीन काहीतरी सापडल्याचा आनंद होतो. आपण खूप भाग्यवान आहोत, हे कुटुंब, मन्ना, किशोर, रफी, तलत, मुकेश आपण एकावेळी ऐकले. एखाद्या पिढीचं भाग्यं असतं ते, आपली पिढी त्यातली समजूयात. 

तिच्यावर मी पहिल्यांदाच लिहिलं. खरं सांगायचं तर धाडस होत नव्हतं. पण एक नक्की होतं. गाण्यांची यादी द्यायची नाही, तिचे ऐकलेले, वाचलेले, ऑथेंटिक, अनऑथेंटिक किस्से, तिच्या आयुष्यात आलेली माणसं, तिचा रूथलेस स्वभाव, तिच्यामुळे अनेक गायिकांचा, संगीतकारांचा झालेला अस्त, वादग्रस्त विधानं, ओपी, चितळकर, डुंगरपूर, तिची भांडणं, रुसवे फुगवे, आवाज उतरल्यावर अट्टाहासाने म्हटलेली गाणी यावर बोलायचं नाही. आपण गुणांचं कौतुक किती मोजक्या शब्दात करतो पण अशा गोष्टींवर माणसं केवढा तरी निबंध लिहितात. आपण कोण ऐकीव माहितीवर टिपण्णी करणारे आणि दुसरा कृतज्ञतेचा भाग असा की तिने जे आजवर आवाजी उपकार केले आहेत ते या सगळ्यापेक्षा मोठे आहेत. त्याचं ऋण कसं फिटणार. अतिपरिचयात अवज्ञा असं म्हणतात. आंबासुद्धा वर्षभर मिळत नाही म्हणून बरंय. पण या आवाजाला हा अतिपरिचयाचा नियम लागूच होत नाही. तास अन तास, दिवस रात्रं, वर्षानुवर्षे हा आवाज कानावर पडतोय पण त्याचा कधी वीट आलेला नाही, येणार नाही.

काय काय पाहिलं असेल या बाईने अट्ठ्याऐंशी वर्षात. हालअपेष्टा, अपमान, हेटाळणी, उद्याची भ्रांत, वाद, आरोप, सन्मान, यश, पैसा, पुरस्कार, लोकांचं अलोट प्रेम आणि छुपा द्वेष, मत्सर ही. एखाद्या परिपूर्ण सिनेमात, पुस्तकात सगळ्या गोष्टी जशा थोड्या थोड्या असतात तसं आयुष्यं आहे. सगळं सगळं भोगून, उपभोगून झालं असेल एवढ्या काळात. माणूस खूप दुःखं झालं की मौनात जातो किंवा सगळे अनुभव आल्यामुळे त्याची पुरचुंडी जवळ बाळगून शांत होतो. तशी आता ती शांत आहे. कुणी काय म्हणतंय यावर ती काssहीही बोलत नाही. श्वास घ्यायला फुरसत नाही असं काम तिने केलंय एकेकाळी आणि आता वेळच वेळ असेल. अवघड असतं जुळवून घेणं. गाणी ऐकत असेल ती? प्रत्येक गाण्याचा किस्सा तिच्याकडे असेल. त्या गाण्याशी जोडलेल्या माणसांच्या आठवणी असतील. मग गाणं बंद झालं तरी ते तिच्या मनात वाजत रहात असेल. आठवणीसुद्धा खूप असू नयेत, निवडणं कठीण होतं. किती माणसं सोडून गेलेली तिनी पाहिलीयेत. काय होत असेल आठवणी आल्या की. तिच्या सुवर्णकाळातले सगळे पुरुष गायक, अनेक संगीतकार, मदनमोहन, तिला सगळ्यात जास्ती गाणी देणारे लक्ष्मीकांत, आरके, चितळकर आणि अशी अजून कितीतरी माणसं.  

तिला या सगळ्यापेक्षा लख्ख काय आठवत असेल तर तिच्या वडिलांनी तिला दिलेली संगीताची देणगी. वयाच्या तेराव्या वर्षी वडील गेले तिचे. खायचं काम नाही लोक हो, पाठीशी दोन वर्षाच्या अंतराने असलेली चार भावंडं आणि श्रीमंतीतून आलेली विपन्नावस्था. पण ती उभी राहिली. तोंड उघडून भीक पण मागता येते पण तिचं तोंड उघडलं गेलं ते गाण्यासाठी. जिगर लागते. आई वडिलांनी तिचं नाव आधी हेमा ठेवलं होतं पण नंतर 'भावबंधन' मधल्या 'लतिके' वरून ते परत ठेवण्यात आलं. आम्ही तुला काय देणार परतफेड म्हणून. शुभेच्छा देऊ शकतो फक्त निरोगी आयुष्यासाठी. घरात कुणीतरी वडीलधारं लागतं नाहीतर सगळा पोरासोरांचा कारभार होतो म्हणून तू जग शंभर वर्ष. शंभराला बारा वर्ष तर कमी आहेत फक्त. वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा. 

अरे हो, तिचं नाव सांगायचंच राहिलं की, काय घ्या एखाद्या ज्ञानी माणसाला माहित नसलं तर, सांगितलेलं बरं, तिचं नाव 'लता दीनानाथ मंगेशकर'.  

जयंत विद्वांस

Author info is not available!

Copyright © 2023 Lata Online. All Rights Reserved.Lalaonline logoRight Parenting logo