ती गेली तेव्हा....

Sushrut Vaidya

ती गेली.....लता गेली.

पण म्हणजे नेमकं काय झालं?

तिची गाणी, त्यातून तिने निर्माण केलेलं विश्व तसंच आहे ना? ते कुठेच गेलं नाहीए. जाणारही नाहीए. हवी तेव्हा ती गाणी ऐकता येणारच आहेत की? त्यात तिचा तोच सूर, तीच आर्तता, तोच नेमकेपणा, तीच जादू, तेच संगीत, तोच नॉस्टॅल्जिया असणार आहे.

तिची ‘नवीन’ गाणी ऐकायला मिळणार नाहीत म्हणायची तर तिने गाणं थांबवून आता उणीपुरी वीस वर्षं होत आली होती. म्हणजे तिच्या जाण्याने नवीन चांगली गाणी आता येणार नाहीत असंही नाही.

बरं, वैयक्तिक ऋणानुबंध म्हणाल तर तोही नाही. प्रत्यक्ष परिचय नाही. कधी कुठे एकत्र काम केलय असही नाही.

मग लता ‘गेली’ म्हणजे नेमकं काय झालं?

ही बातमी ऐकल्यावर नि:शब्द, सुन्न होण्यासारखं नेमकं काय घडलंय?

तिच्या जीर्ण झालेलं शरीरानं आणखी किती वर्षं तग धरायला हवा होता? ‘वासांसि जीर्णानि...’ हे तिच्या बाबतीत खरं नाही का?

की कुणाच्याही मृत्यूने होते तशी आपल्या स्वतःच्या मर्त्यपणाची जाणीव याही मृत्यूने आपल्याला झाली इतकंच?

***********

इयत्ता नववीत असताना मी व माझ्या आतेभावांने जुनी गाणी ऐकायला व जमवायला सुरुवात केली. तेव्हापासून पुढची अनेक वर्षे, अनेक संग्राहकांकडे गेलो. विनवण्या करून, उधार घेऊन, भीक मागून, गाठीला पैसे असतीलच तर विकत घेऊन, मिळतील तशी गाणी ऐकली. दिवसाचे दहा-दहा बारा-बारा तास ऐकली. यात खूप संगीतकार, गायक, गीतकार नव्याने कळले, ऐकायला मिळाले. ‘ती’ यात होतीच, पण नव्याने नाही - ती आधीपासून होतीच.

कोणताही हिंदू रामायण-महाभारत ‘पहिल्यांदा’ वाचत नाही असं म्हणतात. पुस्तक-रूपाने ते हातात येण्याआधी आपल्याला त्याची कथा, त्यातली पात्रे माहिती झालेलीच असतात. लताचा आवाज ऐकण्याचंही तसंच. टेपच्या, ध्वनिमुद्रिकेच्या रूपाने तो हातात येण्याआधी तो माहिती झालेलाच असतो. लताला कोणीच ‘पहिल्यांदा’ ऐकत नाही. ती असतेच...

या सगळ्या धडपडीत तिची खूप नवी-जुनी गाणी मात्र सापडली. म्हणजे गाणी जुनीच, आम्ही नव्याने ऐकत असलेली. ग़ुलाम हैदरचं ‘बेदर्द तेरे दर्द को सीनेसे लगाके’, के दत्तांचं ‘बेदर्द जमानेसे शिकवा न शिकायत है’, सरदार मलिकचं ‘हुई ये हम से नादानी तेरी महफिल मे आ बैठे’, पं अमरनाथांचं ‘जोगियासे प्रीत किए दुख होये’, विनोदचं ‘मेरी उल्फत सोयी है यहाँ’.. अशी कैक. आम्ही वेड्यासारखे ऐकत होतो.

ती होतीच. आणखी खोल खोल होत गेली.

********

असेच एकेक संगीतकार सापडले – अनिलदा, रोशन, सी रामचंद्र, श्यामसुंदर, सज्जाद, हुस्नलाल भगतराम, ग़ुलाम मुहम्मद, मदनमोहन, हेमंत कुमार, जयदेव, खय्याम, सुधीर फडके, चित्रगुप्त, एस एन त्रिपाठी – नौशाद, एसडी, शंकर जयकिशन होतेच.

या सगळ्यात ‘ती’ होतीच. या सगळ्या दिग्गजांच्या दिग्विजयी प्रतिभा जणू जिची आराधना करतात ती त्यांच्या प्रतिभेची प्रिया.. जिच्याशिवाय एकमेकांच्या अस्तित्वाला अर्थच राहात नाही असे अन्योन्य.

आम्ही तिला गृहीतच धरलं होतं. नंतर जुन्या, म्हणजे प्लेबॅक-पूर्व काळातल्या अभिनेत्री-गायिका ऐकल्यानंतर ही बाई किती सुरात गाते हे जाणवलं. म्हणजे, खरं तर, ही काहीतरी ‘वेगळी’ आहे इतकचं जाणवलं. सूर वगैरे कळत नव्हतेच. पण हिच्यावाचून काही गंमत नाही, अर्थ नाही हे कळलं.

ती आणखी खोल जात राहिली.

*********

आता तर ती अस्तित्वाचाच भाग बनून गेली आहे. तिच्या अस्तित्वाची वेगळी जाणीवही होत नाही. रक्तात तांबड्या पेशी, पांढर्‍या पेशी असतात, तशीच ‘लता’ पण असते थोडी. तांबड्या पांढर्‍या पेशींचा कुठे विचार करतो आपण जाणीवपूर्वक? मग तिचा तरी कशाला करावा?

**********

कधीतरी एकदा, बहुधा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सवाच्या शताब्दीच्या महोत्सवात ती आली होती. कार्यक्रम वेगळ्या कुणाचा होता. पण लोकांनी फारच आग्रह केला म्हणून ती फक्त पसायदान गाणार होती. मी फोटो काढायला म्हणून स्टेजच्या अगदी समोरच बसलो होतो. कसेबसे पैसे वाचवून आणलेला रोल. त्यातले चार-पाच फोटो खास तिच्यासाठी म्हणून शिल्लक ठेवले होते. पण ती गायला लागली अन् मी वेड्यासारखा, भान विसरून तिच्याकडे बघतच बसलो. डोळ्यात पाणी असावं – बहुतेक पाणीच – पण त्याच्यापुढे चाललेल्या चित्रपटात ते ही दिसत नव्हतं. बरसात – अनोखा प्यार - अंदाज – महल – तराना - अलबेला – आवारा - अनारकली – नागिन – पतिता – आह – दो बिघा जमीन पासून सगळी मालिका, सगळे चित्रपट – म्हणजे त्यातली गाणी -  माझ्या डोळ्यातल्या पाण्याच्या पडद्यावर उमटत होती. हिनी – या आपल्यासमोर आठ-दहा फुटांवर बसलेल्या बाईने गायली आहेत ही गाणी! आणि ती आत्ता इथे माझ्यासमोर ....

किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनी तिहीं लोकीं ...

संपत आलं पसायदान. कसाबसा भानावर येत मी फोटो काढले. पण त्याआधी माझ्या डोळ्यासमोर दिसलेल्या चित्रपटाने ती माझी कोण याचं चित्र स्पष्ट करून टाकलं होतं. फोटो असेच. जनरीत, लोकोपचार म्हणून.

*************

अशा किती आठवणी, किती प्रसंग? किती वेळा तिच्या सुरांनी आनंद द्विगुणित केलाय, साजरा केलाय, सांत्वन केलय, आधार दिलाय, सावरून धरलंय? आणि हे सगळं नकळत. वसंत ऋतुत निसर्गाला आलेल्या बहरासारखं. तो असतोच पण जाणवत नाही. जाणवतो फक्त त्याचा परिणाम. रक्तातल्या पेशींसारखं... त्या असतातच... तीही असतेच – होतीच – असणारचं.

************

असणारच?

पण आज तर ती नाही? असं असू शकतं असं कधी मनातच आलं नाही. हे समीकरण शक्यतेच्या कक्षेत कधी येईल असंच वाटलं नाही. आपल्या रक्ताचा, अस्तित्वाचा एक भाग एकदम नाहीसाच झाला तर? अस होऊ शकेल अस का कधी कुणाला वाटेल?

तसंच हे काहीसं.

पण हे झालंय आज तिच्या जाण्यानं. ती गेली म्हणजे ‘हे’ झालं.

तिच्या जाण्याने मला माझ्या मर्त्यपणाची जाणीव झाली ती अशी. म्हणजे माणूस मर्त्य आहे, मी माणूस आहे, म्हणून मीपण कधीतरी मरणार आहे असल्या सार्वत्रिक, सॉक्रेटिसी ज्ञानाची जाणीव नाही. तर थोडासा मीही तिच्याबरोबर आज मरून गेलो आहे, या अत्यंत आत्ममग्न वास्तवाची जाणीव.

पण या घटनेच्या आघाताच्या ताजेपणातून बाहेर पडल्यावर जाणवते आहे, की ती आहेच. तिच्या गाण्यांमधून, तिच्या गाण्यांचा जो अंश मा‍झ्यात समाविष्ट झाला आहे त्यात ती आहेच. निदान ती ज्यांच्या रक्ताचा, अस्तित्वाचा भाग आहे अशी पिढी जिवंत असेपर्यंत तरी ती राहीलच.

म्हणजे दिनांक सहा फेब्रुवारी 2022 रोजी जो मृत्यू झाला तो तिचा नाहीच. तो मृत्यू तिच्या मृत्यूचा.

ती कुठे गेली? गेला तो.

ती आहेच.

(*For those who want to read the English Translation of this article. Here is the link- Death of a Death!)

Author info is not available!

Copyright © 2023 Lata Online. All Rights Reserved.Lalaonline logoRight Parenting logo