मम सुखाची ठेव (लेखक- तात्या अभ्यंकर)

Lata Online Archive
A beautiful Marathi article/poem on Lata Mangeshkar by Tatya Abhyankar that describes the gaayaki of Lata, and the impact on the listeners! Received as a Whataspp Forward, so not sure of the source or authenticity of the writer.
 

मम सुखाची ठेव (लेखक- तात्या अभ्यंकर; स्रोत- व्हॉट्सॅप)

ती आली, तिनं पाहिलं, तिनं जिंकलं!

ती स्वरलता आहे, ती गानसम्राज्ञी आहे, ती मेलडीक्वीन आहे..

षड्ज पंचम भावातला सुरेल जुळलेला तानपुरा,
अन् त्यातला नैसर्गिक शुद्ध गंधार..
तो तिच्याच गळ्यात आहे.
नव्हे, तर त्या गंधाराचं तंबोर्‍यातलं स्वयंभुत्व
हे तिच्या गळ्यानेच सिद्ध केलेलं आहे..

कोमल अन् शुद्ध रिखभ, हे एरवी एकमेकांचे वैरी,
स्वभावाने अगदी एकदुसर्‍याच्या विरुद्ध,
परंतु दोघेही तिचेच आहेत..

तोडीत दिसणारं कोमल गंधाराचं कारुण्य
हे तिनंच दाखवलं आम्हाला..
आणि बागेश्रीतला शृंगारिक कोमल गंधारही
तिनंच शिकवला आम्हाला..

तिने स्वर लावल्यावर
तीव्र मध्यमातली अद्भुतता दिसली आम्हाला..
आणि शुद्ध मध्यमाचं गारुडही तिनंच घातलं आम्हाला..

तिच्या पंचमातली अचलता आम्ही अनुभवली..

महासागराच्या ऐन मध्यावर एखाद्या जहाजाला
जसा एक आश्वासक सहारा मिळावा,
तसा सहारा, तसा आधार हा तिचाच पंचम देतो..

तिच्याइतका सुरेख, तिच्या इतका गोड
शुद्ध धैवत गाऊच शकत नाही कुणी....
आणि तिच्याइतकं कुणीच दाखवू शकत नाही,
कोमल धैवताचं प्रखरत्व आणि त्याचं समर्पण..

कोमल निषादाचं ममत्व अन् देवत्व,
तिच्यामुळेच सिद्ध होतं...
आणि तिच्या शुद्ध निषादामुळेच कळली आम्हाला
गाण्यातली मेलडी..

तिचा षड्ज..

ते एक निरभ्र मोकळं आकाश आहे..

आणि तार षड्ज?

गायकी म्हणजे काय, पूर्णत्व म्हणजे काय,
गाण्याचा असर म्हणजे काय,
हे तिथंच कळतं आम्हाला, तिथंच जाणवतं..
तिच्या तार षड्जात..

तिचा तार षड्जच पूर्ण करतो आमच्या
सगुण-निर्गुणाच्या अन् अध्यात्माच्या व्याख्या...
आणि तोच भाग पाडतो आम्हाला,
ईश्वरी संकल्पनेवर विश्वास ठेवायला..

ती गाते आहे, आम्ही ऐकतो आहोत..

सलीलदा, सचिनदा, पंचमदा, मदनमोहन, नौशादमिया
अन् कितीतरी अनेक..

तिच्या गळ्याकरताच केवळ,
पणाला लावतात आपली अलौकिक प्रतिभा..
अन् तिच्याकडे पाहूनच
खुला करतात बाबूजी
'ज्योती कलश छलके' चा अमृतकुंभ..

तिचं गाणं हा आमचा अभिमानही आहे.
अहंकारही आहे..
तिचं गाणं ही आमची गरजही आहे,
आणि सवयही आहे..
तिचं गाणं हे आमचं व्यसनही आहे,
आणि आमचं औषधही आहे...
तिचं गाणं हीच आमची विश्रांती आहे,
आणि तेच आमचं सुख-समाधान आहे...

इतकंच म्हणेन की,

अन्न, वस्त्र, निवारा आणि तिचं गाणं
ह्या आमच्या मूलभूत गरजा आहेत..

शब्द खूपच तोकडे आहेत,
तेव्हा पुरे करतो आता हे शाब्दिक बुडबुडे...
शेवटी एवढंच सांगून थांबतो की तिचं गाणं ही
मम सुखाची ठेव आहे!
मम सुखाची ठेव आहे!

Author info is not available!

Copyright © 2023 Lata Online. All Rights Reserved.Lalaonline logoRight Parenting logo